Stubbornness ( जिद्द ) : वयाच्या मर्यादेत न बसणारे तारुण्य
Stubbornness म्हणजेच जिद्दीच्या बाबत आज बोलायचे ठरवले कारण आजची पिढी शरीराने तर जिम मध्ये घाम गाळत आहे पण मनाने मात्र म्हातारी झाल्यासारखी वाटत आहेत. देशाच्या हितासाठी लढणारे क्रांतिकारक, समाजसुधारकांच्या भूमीत कुठेतरी तरुणाई तील धग आज हरवल्यासारखी वाटते. तेव्हा अश्यात अश्या प्रखर शब्दांनी मनाला उजळा मिळावा हे म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असल्यासारखे असले तरी नसल्या पेक्षा असणे केव्हाही छानच नाही का?
तर मला खूप आवडलेली ही कविता आजच्या काळात आवश्यक असलेली संस्कारिक मानसिकता जपून जिद्दीने काहीतरी ध्यास मनाशी बाळगायला सांगत आहे. मला यातील सर्वच कडवी खूप आवडली आपणही ही कवित वाचून आपले मत कमेंट मध्ये नक्की सांगावे.
मराठी कविता – ओळख जगास माझी
ओळख जगास माझी
शब्दांत मावू नये
थकलो जरी प्रयत्नांत
अंतरात आग धगू दे
जगातील शिखरे अनेक
गर्जुनी थकली आहेत
आधीच्याच पाऊलखुणा
वाटेवर मिसळत आहेत
आकाशाशी मैत्री करुनी
स्वप्न नवे प्रत्येक आहे
ओळख माझी तुमच्यासवे
प्रत्येकाच्या मनांत आहे
वाटेत गरुड, ससाणे-घारी, जरी वैर कोणाशी कशाचे आहे कोल्हे असो की बगळे सगळे एका उंचीवर आहेत
मावळली ही ज्योत जरी
राखेतून पुन्हा उदय आहे
दिसलो मी एकटा जरी
साथ मज परमेश्वराची आहे
- T.Vishal
विश्लेषण :
लेखक/ कवी अत्यंत यांची माझ्या मते अत्यंत प्रेरणादायी अशी मनोभूमिका ते या कवितेतून शब्दबद्ध करत आहे, ज्यात पहिल्या कडव्यात एक आशावादी प्रार्थना आपल्या स्वतःच्याच अंतरात्म्याला करताना लेखक म्हणत आहेत, आपण अत्यंत यशस्वी झालो पाहिजे आणि प्रयत्न करताना कितीही थकवा / निराशा आली तरी पुन्हा जिद्दीने प्रयत्न करण्याची उमेद/ इच्छा तयार व्हावी.
दुसऱ्या कडव्यात लेखक मनाला अत्यंत पूरक सल्ला देताना दिसत आहेत असे मला वाटते. माझ्या मते इतरांशी स्पर्धा न करण्याचे मनाला सांगत असताना ते एका वास्तवाचे मनाला भान करून देताना दिसत आहेत ज्यात जगातील शिखरे म्हणजे ज्याची ज्यांची आजपर्यंत अशी स्तुती झाली की हे केले म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे कित्येक शिखरे लोकांनी सर केली आणि आज त्यांच्या पाऊलखुणा त्याना देखील सापडत नसल्याचे इथे लेखक सांगून गंतव्यास (पोहोचायचे ठिकाण) जास्त श्रेय न डेटा इथे प्रवासाला महत्व देत नवी शिखरे सर करण्या विषयी प्रेरणा दिल्याचे दिसते.
तिसऱ्या कडव्यात आकाशाशी मैत्री करुनी असे सांगून मागील कडव्यातील प्रवासाचे महत्व आणि नवी शिखरे विषयीचे मत अधिक अधोरेखित करण्यासाठी व सतत यशाच्या उंचीवर राहण्याची इच्छा लेखक व्यक्त करताना आवर्जून ओळख माझी तुमच्यासवे प्रत्येकाच्या मनात आहे म्हणत वाचक तसेच यशाच्या प्रवासातील वाटसरू बद्दल तर बोलतच आहेत पण त्यातून त्याना आकाशाच्या / यशाच्या उंचीवर राहून देखील गर्वाकरिता जागा नसल्याचे दाखवत आहेत.
चौथ्या कडव्यात यशाच्या प्रवासात दुसऱ्या कडव्यातील उद्देश्य पुन्हा अधोरेखित करत असताना तुलनात्मक स्पर्धेसही लेखक नाकारत आहेत आणि कुणाशीही स्पर्धा करण्याची गरज नसल्याचे लेखकाचे मत असल्याचे मला वाटते कारण सगळे एका उंचीवर आहेत असे सांगून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यामुळे त्याने केलेला प्रवास आणि तुमचा प्रवास हा कधीच एक होऊ शकत नाही तेव्हा स्पर्धा बरोबरीची कशी होणार आणि दुसरे म्हणजे जे रूपक प्राणी व पक्ष्यांच्या रूपात वापरले त्यावरून प्रत्येकाचा मूळ स्वभाव हा फारसा वेगळा नसल्याचे लेखकास सुचवायचे असावे असे मला वाटते तसेच माझ्या मते “सगळे एका उंचीवर आहेत” असे सांगून लेखक स्वतः एका समान किंवा उच्च दृष्टिकोनातून इतर यशाच्या मार्गावरील प्रवाश्यांकडे बघत असल्याचे मला वाटते.
पाचव्या आणि शेवटच्या कडव्यात ” मावळली ही ज्योत जरी, राखेतून पुन्हा उदय आहे “असे सांगून अंत्यत उच्च अशी मानसिकता लेखक व्यक्त करत असल्याचे मला वाटते कारण सुरुवातीच्या कडव्यात जसे गंतव्या पेक्षाही प्रवासाचे महत्व सांगणारे लेखक त्या भावनेस इतके वाहून/ समर्पित आहेत की, मृत्यू देखील त्यांच्या यशाच्या प्रवासाला थांबवू शकणार नाही असे सांगत पुढच्या ओळीत दिसलो मी एकटा जरी साथ मज परमेश्वराची आहे असे सांगून इथे वाचकांस देखील आपल्या जिद्दीची चव चाखायला लावणारे लेखक माझ्या मते परमेश्वरावरील श्रद्धेच्या जोरावर आपल्या यशाच्या प्रवासाला सुरू ठेवण्याचे लेखक सांगत आहेत पण इथे ही कविता अजून सुंदर होते जेव्हा आपण लक्षात घेतो की लेखक हे सर्व काही आपल्या मनाला सांगत आहे. तेव्हा त्यांचा ह्या जिद्दीला शतश: प्रणाम आणि अश्याच कविता आणि त्यांचे विश्लेषण वाचण्या करिता kridavishwa.in वर नेहमी भेट देत रहा.
(डिस्क्लेमर (Disclaimer): हे मूळत: मराठी भाषेत लिहिलेले काव्य आहे. जर तुम्ही याचे इतर कोणत्याही भाषेत भाषांतर (GTranslate) करून वाचन करत असाल, तर मशीन ट्रान्सलेशनमुळे शब्दांमध्ये किंवा अर्थामध्ये त्रुटी (चुका) असणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या स्वयंचलित भाषांतरामध्ये (Automated Translation) होणाऱ्या कोणत्याही चुकीसाठी लेखक किंवा ‘क्रीडाविश्व’ (kridavishwa.in) ची टीम जबाबदार असणार नाही. कवितेची खरी भावना समजून घेण्यासाठी ती मूळ भाषेतच वाचण्याचा सल्ला दिला जातो.)







2 Comments
शब्द तुमचे मोत्यासारखे, अर्थ तिचा खोल, ओळख जगास करून दिली खूप छान कविता आहे