Home / विचारवेध / माणुसकीच्या शोधात : माणुसकी हरवलेला समाज आणि प्राण्यांवरील क्रौर्य

माणुसकीच्या शोधात : माणुसकी हरवलेला समाज आणि प्राण्यांवरील क्रौर्य

साखळदंडात बांधलेला निरागस कुत्रा, ज्याच्या डोळ्यातून वेदना आणि भीती दिसते. प्राण्यांवरील अमानवी वागणुकीवर विचार करायला लावणारी एक भावनात्मक फीचर्ड इमेज.

माणुसकी हरवलेला समाज आणि प्रगत समाजातील कोळसुंदे

अजून माणसात ‘माणुसकी‘ शिल्लक आहे? खरचं असे कधी कधी आपल्याला जे वाटते ते काही चुकीचे नाही. उलट एखादी घटना घडते आणि आपण थोड्या काळाने तिला विसरतो हेच मुळात चुकीचे आहे. आजच्या काळात माणसातील माणूसकी मेली असे नुसते म्हणून जमणार आहे का? किंवा असे म्हणणे कितपत योग्य आहे?. एखादा सद्य परिस्थितीवर बोलणारा कोणीतरी राजकारणी पाहिजे किंवा “शिवाजी जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात” ह्या सगळ्या मानसिकता आपण पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत आणि जगलोही आहे. पण कधी संपणार हे दुष्टचक्र?

आज हल्ली समाजात ज्या विक्षिप्त मानसिकतेने काही अमानुष घटना घडल्या त्या पाहता माणसाची वृत्ती प्राण्याहून खालावली आहे. ह्या विषयावर जास्त विस्तृत पणे सांगवेसे वाटत नाही. कारण वाईट गोष्ट ही वाईटच असते आणि त्याचा धिक्कारच केला पाहिजे मग ती केव्हा, कोणी किंवा कशी केली ह्या पेक्षा.

सोबतच एक गोष्ट खटकत राहते ती म्हणजे अशी की, एकूण माणसाचा स्वभाव आणि आजची परिस्थिती ह्याचा संबंध बघता, नेमकी समाजाकडून कुठे चूक झाली की ज्यामुळे आपण आज ‘माणूस प्राणी’ मधून ना धड ‘माणूस’ म्हणवून घ्यावे आणि नाही ‘प्राणी’ अशी अवस्था झाली आहे.

आपल्याला वाटेल की समाजात जशी वाईट प्रवृत्ती आहे तसा चांगुलपणा ही तितकाच तोडीचा आहे मग असे कशाला म्हणायचे आणि आमच्या kridavishwa.in चे धोरण देखील तेच आहे की, वाईट गोष्टींच्यावर जास्त न बोलता आपल्या अवतिभोवतलच्या वातावरणात नेहमी चांगल्याच विचारांची रसद लागली पाहिजे. थोडक्यात चांगल्याच गोष्टींचा विचार करावा पण, काही गोष्टींकडे फार काळ दुर्लक्ष करून चालत नाही.

ह्या विषयावर बोलायचे झाले तर कितीही बोलले तरी बोलणे संपेल असे वाटत नाही. आणि म्हणूनच नेमकी विषयाची सुरुवात कुठे करावी हे कळेना. पण वाचकहो, तुम्हाला सांगतो आज सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणवला जाणारा माणूस जेव्हा स्वतः चे अहित ओळखू शकत नाही तेव्हा दोष कोणाला द्यावा?

सामाजिक असहिष्णुता

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असे म्हणतात आणि ते खरे आहे असे वाटते देखील पण ही व्याख्याच मुळात चुकीची केली आहे असे वाटते पण मुळात चांगुलपणा वाढवा म्हणून मूळ प्रवृत्ती न सांगता मूळ प्रवृत्ती मधून चांगले कसे निर्माण करता येईल हे सांगण्यासाठी तोलून मापून वापरलेले हे शब्द म्हणजे अतिशय हुशारीने वापरलेली योजना होती. कारण माणसाचा मूळ स्वभाव हा स्वार्थी आहे आणि समाजात तो राहतो कारण त्यात माणसाचा स्वार्थ दडलेला आहे म्हणून, पण त्याच्या ठायी असलेला स्वार्थी स्वभाव मर्यादेपेक्षा न वाढता समाजाविषयी प्रेम वाढून त्याचा सामाजिक व मानसिक स्तरावर विकास व्हावा म्हणून ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ असे म्हणल्या गेले.

समाजाची आपल्याला असलेली गरज

तसा माणसाला फारसा इतरांचा पुळका पहिल्यापासूनच नव्हता पण समाजात राहिल्याने सुरक्षा, सुविधा, कुटुंब असे एक ना अनेक फायदे दिसायला लागले आणि माणसाचा हस्तक्षेप इतका वाढला की, त्याच्या वाटेत येणाऱ्या इतर गोष्टींचे अस्तित्वच संपत गेले, माणसाने ज्या काही चांगल्या गोष्टी तयार केल्या आहेत त्याहून जास्त आधीपासून अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींना खराब केले आहे. आणि वाईट / समाजविघातक गोष्टी ज्या तयार केल्या त्या वेगळ्याच.

संत मंडळी, विचारवंत सोडले तर ह्या जगाचे चांगले व्हावे आणि ते टिकावे असे कोणालाही वाटत नाही आणि त्यांच्या शिवाय ह्या करिता इतर कोणी झटत देखील नाही. समाजात स्वतःपेक्षा वेगळे विचार, मत, धर्म, संस्कृती किंवा जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींचा किंवा घटकांचा स्वीकार न करण्याची किंवा त्यांचा आदर न करण्याची प्रवृत्ती ह्यालाच ‘सामाजिक असहिष्णुता’ म्हणल्या जाते. आणि ही लक्षणे माणसात स्वार्थ नावाची विकृती मर्यादे पलीकडे वाढल्यावर होणाऱ्या मानसिक आजारात दिसून येते. जिचे हल्ली समाजातील प्रमाण जरा जास्तच दिसून येते.

प्रगत तंत्रज्ञानाचे दुर्लक्षित अपाय

आज माणसाची जीवनशैली प्रगत तंत्रज्ञानामुळे जास्तीत जास्त स्वावलंबी व अधिक सुरक्षित होत चालली आहे. माणसाला वाटते की, माणसाला दुसऱ्या माणसापासून धोका आहे. आणि तो शक्य तितका अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु मूळ सत्य ह्याचा अगदी विरोधातील आहे. म्हणजे आजची परिस्थिती अशी नाहीये असे मी म्हणत नाही पण ग्लोबलायझेशन च्या आधीच्या काळात जिथे माणसाचे माणसाशी संबंध घनिष्ठ होते तेव्हा त्यात इतरांना समजून घेण्याची प्रवृत्ती होती. निस्वार्थपणा, त्याग, कर्म, धर्म ही तत्त्वे अधिक प्रखर पणाने जिवंत होती.

याचे थोडक्यात उदाहरण घ्यायचे झाले तर प्रवासात एखाद्या दुसऱ्या अनोळखी गावी संध्याकाळच्या वेळी तुम्ही नाईलाजाने अडकलात तर तुमच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे की नाही याची नुसती चौकशीच नाही तर वेळप्रसंगा नुसार गावातील गावकरी स्वेच्छेने निःस्वार्थ भावनेने कुठल्याही अपेक्षे विना स्वतः च्या राहत्या घरात व्यवस्था करायचे. निदान आपल्या कडून तरी कुठली अपेक्षा ठेवतीलच असे नव्हते आता परमेश्वरा कडून काहीतरी मिळेल किंवा पुण्य मिळेल ही गोष्ट वेगळी. पण आज अशी परिस्थिती आहे की, तुम्ही अश्या परिस्थितीत जर कधी अडकलात तर चौकशी सोडा तुम्ही पैसे देतो म्हणाले तरी दहा वेळा विचार करतील आणि तरी देखील मदत करतील ह्याची शाश्वती नाही.

स्वातंत्र्य विरुद्ध स्वैराचार

ह्याला जबाबदार कोण? अशी प्रश्ने मोजण्या पलीकडे असतील पण उत्तरे शोधण्याची तसदी आपल्या पैकी किती जण घेतात. आज समाजात ह्या सर्व विषयांवर चर्चा होणे नितांत आवश्यक आहे. ह्या मानसिक आजारपणावर दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आपल्या जवळ प्रत्येक गोष्टी करिता पळवाट आहे पण जेव्हा आपण कुठलीही क्रिया करतो तेव्हा ती करण्या अगोदर आपण ती टाळून दुसरी क्रिया करायची किंवा नाही करायची हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्या जवळ असते म्हणजे ती देखील एक क्रियाच असते आणि एवढे आपण नियंत्रित करू शकतो पण क्रिया घडल्यावर त्या क्रियेच्या मिळणाऱ्या परिणामावर मात्र आपले कुठलेही नियंत्रण नसते. आणि प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया ही मिळतेच एवढे नक्की.

बरे दुसऱ्याच्या मदतीला न येणे एक गोष्ट आहे पण दुसऱ्याच्या मानसिक व शारीरिक अस्तित्वाला कुठल्याही पद्धतीने इजा पोहोचवण्याची विचार वजा इच्छा मनात येणे किंवा तसे कृतीत आणणे हे सहनशक्ती च्या पलीकडे आहे आणि ते तसेच असले पाहिजे जेणेकरून जेव्हा समाजातील कोणतीही विकृती असे काही कृत्य करेल त्यावर वेळीच कठोर शासन व्हायलाच पाहिजे अर्थातच स्वतः हातात शस्त्र घेण्याचे दिवस आता संपले आहे पण वेळ न दवडता योग्य मार्गाने ह्या कृतीचे रिपोर्टिंग आवश्यक त्या ठिकाणी केले पाहिजे.

संस्कार कशाला म्हणतात? हे जर आज कोणाला विचारले तर उत्तरे ऐकण्या सारखी असतात. पण संस्काराचा मुद्दा मी इथे का काढत आहे असे विचाराल तर त्याचे कारण, मूळ कळीचा मुद्दाच मुळात ‘संस्कार’ आहे जबाबदारी ठरवायची झाली तर माझ्या मते कोणी एक दोषी नाही आपण सगळे आहोत, त्यामुळे नंतर कैंडल मोर्चे काढून जे लोक स्वतःला चांगले समजत असतील अश्यानी पुनःश्च एकदा पुनर्विचार करायला पाहिजे. निषेध नक्की दर्शवावा त्यास विरोध असण्याचे कारण नाही.

पण स्वातंत्र्य कशाला म्हणायचे आणि स्वैराचार कशाला म्हणतात हा फरक नव्या पिढीला समजावून देणे ही आपलीच जबाबदारी आहे. माणसाच्या मनात क्षमा, करुणा, कृतज्ञता, सहानुभूती, नम्रता, उदराता, संयम, वात्सल्य आणि प्रेम ह्या व अश्या चांगल्या भावनांची व विचारांची ज्यामध्ये विवेक, श्रमदान, त्याग, निस्वार्थपणा, सेवा ह्यांची ओळख करून देणे हे संस्काराचे काम आहे आणि हे करून देताना कोण कमी पडत आहे. हे सांगून बोटे एकमेकांकडे दाखवण्या पेक्षा प्रत्येकाने शक्य होईल त्या परीने आपले योगदान समाजात दिले पाहिजे.

पूर्वग्रह दूषित असण्याचे दुष्परिणाम

मी इथे आवर्जून कुटुंब हा उल्लेख करत नाही आहे तर समाज करत आहे याला कारण म्हणजे ‘कुटुंब’ म्हणून आपण आपली सीमा संकुचित करण्यामुळेच आपण जिथे आज आहोत तिथे त्यामुळेच आहोत. त्यामुळे जेवढे आपण समाजाला आपले मानाल आणि तेही कुठलाही पूर्वग्रह दूषित न ठेवता तेवढे ते आपल्या साठी हितकारक आहे. आता समाजाला आपले मानणे, ही गोष्ट करण्या अगोदर स्वतः च्या परिवाराला आपले मानायचे कसे यावर प्रयत्न करणे गरजेचे आहे आणी पूर्वग्रह दूषित असल्यामुळे कुटुंबात एकमेकां विषयी ईर्ष्या, मत्सर, द्वेष, ह्या सारख्या भावनांमुळे कटुता येऊन स्वतः सोबत इतरांचे देखील संसार उध्वस्त झालेले आपल्यापैकी कित्येकांनी पाहिलेले असेल.

चर अचर सृष्टीतील सर्व जड चैतन्यात परमेश्वर बघायला शिकवणारे आपले संत महात्मे जिथे होऊन गेले तिथे आपण देखील राहतो तेव्हा ही शिकवण फक्त काही साधू – साधकांसाठी नसून सर्वांसाठी आहे व इथे परमेश्वर बघायला सांगत आहेत तेव्हा ‘सत्य’ आणि चांगल्या गोष्टींना परमेश्वर मानले आहे तेच सर्वांनी शिकणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.

समाजात कोण कोण आहेत?

शेवटी समाज आपला मानायचे हे समजले पण आपण समाजात कोणाला गृहीत धरतो?. सर्वसाधारणपणे समाज हा माणसांचा गृहीत धरला जातो. मनुष्या व्यतिरिक्त समाजाची व्याख्या कोणी केली का नाही मला माहीत नाही पण मला असे वाटते की, “समाजात ते सर्व घटक मोडतात ज्यांचा संबंध माणसाशी येतो मग ते सजीव असो की निर्जीव.”

मला सांगा आपण एखादा फ़ोन घेतला तर तो लवकर खराब कसा होईल ह्या पद्धतीने आपण वापरतो की, जपून – जपून आहे तेवढे त्या वस्तूचे आयुष्य पूर्ण कसे मिळेल याचा विचार करून वापरतो?. अगदी त्याच न्यायाने जसे आपल्याला आपला मोबाईल स्वतः साठी आवश्यक आहे असे वाटते तसेच समाजात माणसाचा संबंध जिथे-जिथे आहे त्या सर्व घटकांचे समाजात काही ना काही काम आहे. त्यांची निर्मिती कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या उद्देश्याने केलेली आहे मग ती माणसाने केलेली असेल किंवा निसर्गाने, त्यामुळे आपण त्या घटकांशी कसे वागतो हे सगळ्यात महत्वाचे आहे.

कारण सर्वात बुद्धिमान प्राणी, नाही करुणा, वात्सल्य, जिव्हाळा ह्या भावनांना समजू शकला तरी किमान स्वतः च्या स्वार्थाचा आणि हिताचा विचार तरी त्याने करून सर्वांशी चांगले वागण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण कधी कधी काही गोष्टीना आपली गरज जितकी असते त्याहून जास्त आपल्याला त्या गोष्टीची गरज असू शकते किंवा असते. पण जर आपण वेळीच सावध होऊन स्वत:ची चूक मान्य करत स्वतः मध्ये सुधारणा केली नाही तर उद्या कदाचित वेळ निघून गेल्यावर केवळ पश्चातापच नाही तर स्वत:च्या अस्तित्वाची लढाई देखील आपण हरू शकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भूतदया

वरील सुभाषित हे आचार्य चाणक्य यांनी लिहिले असून, आचार्य चाणक्य म्हणजे ज्यांनी प्रसिद्ध ‘अर्थशास्त्र’, ‘चाणक्य नीती’ असे ग्रंथ लिहिले. जे मौर्य साम्राज्याचे महामात्य (पंतप्रधान) होते व सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लगार. ज्यांच्या मदतीने सम्राट चंद्रगुप्त मौर्य ह्यांनी नंद (पाटीलपुत्र) वंशाचा ह्रास करून विशाल मोर्य साम्राज्याची स्थापना केली. तसेच विश्व वंद्य तक्षशिला विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राचार्य असे आचार्य चाणक्य ह्यांच्या मते “जो मनुष्य जगातील सर्व प्राणिमात्रांना स्वतःसारखेच समजतो (म्हणजेच स्वतःला होणाऱ्या वेदना इतरांनाही होतात हे ओळखतो), तोच खरा ज्ञानी आणि सत्य पाहणारा असतो “. तेव्हा यावरून पूर्वापार आपल्या संस्कृतीने आपल्याला निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर दया व वात्सल्य करायचे शिकवले आहे हे समजते.

साधी पाण्यातील लव्हाळी कमी झाली तरी माणसाच्या जीवनाला आवश्यक असणारा ऑक्सिजन कमी होऊ शकतो तेव्हा परस्पर संबंधावर टिकून असलेला निसर्ग यामधील एखादा घटक कमी झाला तर त्याचे परिणाम स्वरूप निसर्गाचे संतुलन बिघडून निसर्गातील इतर सर्व घटकांना त्याचे दुष्परिणाम शिक्षा म्हणून भोगावे लागतात. पण दुर्दैवाने नेहमी हे संतुलन बिघाडासाठी माणसा व्यतिरिक्त इतर कोणतेही घटक जबाबदार नसतात.

सध्याच्या समाजातील प्राण्यांची अवस्था

कुत्रा

पूर्वीपासून कुत्रा हा माणसाचा मित्र आहे असे म्हणल्या जाते पण कुत्र्यांनी त्यांच्या ईमानदारी व जिव्हाळ्यातून त्यांनी प्राण्यांपेक्षाही नव्हे – नव्हे तर माणसांपेक्षा जास्त माणुसकी दाखवून आपण माणसांना नेहमीच आरसा दाखवला आहे. आपल्या स्वार्था साठी जंगलातील ह्या मूळ जंगली प्राण्याला माणसाने माणसाळवलं तर खर पण आपल्या चुकांचे इतके आरश्यासरखे स्वच्छ चित्र आपल्याला दाखवून सुद्धा माणूस चांगल्याची कास सोडून वाईटाची बाजू घेतो हे पाहून खंत वाटते.

आज प्रगत तंत्रज्ञानाचे दुर्लक्षित अपाय येथेही प्रादुर्भाव करताना दिसून येतात आज तशी कुत्रा असेल घोडा असेल किंवा शेळी, मेंढी, मांजर ह्यांची पूर्वी जशी गरज होती तशी आता राहिली नसून व्यापारीकरण झाले आणि एग्जॉटिक एनिमल नावाखाली ठराविक प्रजातीचे प्राणी विदेशातून आणून त्यांना नुसते पाळायचे नाही तर एखाद्या राजा सारखी त्यांची सरबराई करायची आणि घरातील वृद्ध आई वडिलांना जिथे घरात जागा नाही तिथे हे प्राणी स्वतः च्या सोफ्यावर बसलेले असतात.

बरं विदेशातून समजा एग्जॉटिक एनिमल म्हणले तर कुत्रे मांजरे येत नाहीत ते आणखीन अपरंपरागत असतात. जसे सरडे, पाली, साप वगैरे इत्यादी पण विदेशातून आणल्या जाणाऱ्या कुत्र्यांची देखील संख्या कमी नाही. आणि माणसाचा विक्षिप्त पणा कुठे कुठे इतका वाढतो की काय सांगावे बाहेरील देशातील कुत्रा म्हणजे एक नंबर आणि स्वतः च्या गल्लीत ला कुत्रा म्हणजे खराब? त्या विशिष्ट जातीच्या कुत्र्याला खायला विशिष्ट कंपनीचे खाद्य आणि गल्लीतले कुत्रे किती दिवसाचे उपाशी? ते नाल्यात आणि उकिरड्यावर पोट भरतात.

कुत्रा प्राणी असेल किंवा इतर कुठलाही प्राणी तो जिथे जन्माला तिथले वातावरण त्यास अधिक हितकारक असते आणि तेथील निसर्गला त्यांची गरज असते आपल्या भोग विलासीता मानसिकतेतून आपण जेव्हा बाहेर येवू तेव्हा आपल्या हातून वेळ गेलेली नसावी एवढीच प्रार्थना. जी गोष्ट कुत्र्या बाबत आहे तीच जवळ जवळ सर्व जनवरांच्या बाबत आहे. परदेशातले काय ते छान आणि आपल्या इथले घाण ही विचार प्रवृत्ती आत्मघातकी आहे. आजच्या काळात कोणतेही जनावर आपण गरज कमी आणि हौस म्हणून जास्त पाळतो. तसा मी जनावर पाळण्याचा विरोधात मुळीच नाही.

उलट माझ्या मते मूळ जंगलातील प्राणी वंशानुवंशे आपण माणसाळावून आज ना ‘घर का ना घाट का’ असे करून सोडले आहेत शिवाय काही काळ एखादा प्राणी हौस म्हणून पाळायचा आणि नंतर हौस भागली की सोडून द्यायचे अशी देखील वृत्ती काही ठिकाणी पाहायला मिळते हे सांगताना एक समाजातील घटक म्हणून मला देखील लाज वाटते कारण आपण कुठे तरी कमी पडतो म्हणून अश्या प्रवृत्ती आज हे करताना विचार करत नाही.

आता हौस भागली म्हणून सोडून दिल्यावर ह्या जनावरांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या सांभाळ करणाऱ्याने पाहून मला सांगावे की, होत नव्हते तर त्या मुक्या जनावराला आधी का जीव लावला? मला खात्री आहे त्यांच्या जवळ उत्तर नसणार आहे. पण समाजातील माणूस सोडून प्रत्येक घटक त्याचे त्याचे काम करून चांगले काही तरी द्यायच्या प्रयत्नात असतो. तो त्याचे योगदानाचे कार्य पूर्ण करतो. पण माणूसच एकमेव प्राणी असा आहे जो चांगल्या वाईटाचा विचार जबाबदारीने करत नाही. जेव्हा हे भटके कुत्रे तसेच सोडून दिलेले कुत्रे व इतर प्राणी रस्त्यावर फिरतात तेव्हा त्यांचे तर हाल होतातच पण त्यांच्या संख्येवर देखील नैसर्गिक नियंत्रण राहत नाही. आणि अपघातांत दगावण्याचे प्रमाण देखील वाढते. त्यामुळे मी म्हणत नाही की परिस्थिती इतकी वाईट आहे तर सर्वांनीच जबाबदारी घ्यावी. उलट माझे म्हणणे आहे की, ज्यांना शक्य आहे त्यांनी अश्या प्राण्यांना सांभाळून परिस्थितीला अजून बिघडण्या पासून वाचवावे.

गाय

भारतीय संस्कृतीत गाईला, म्हणजेच गौ मातेला अत्यंत पवित्र आणि मानाचे स्थान दिले जाते. देश-विदेशातही अनेक ठिकाणी तिला आदराने सांभाळले जाते. ही वस्तू स्थिती आहे आणि हे ऐकून, पाहून आनंद व अभिमान वाटतो पण त्याच वेळी सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे असे नाही त्यातल्या त्यात व्यापारीकरणा च्या दृष्टीने गायीचे दूध इतके महत्वाचे असून देखील गायीची योग्य काळजी घायची सोडून गायीला काही ठिकाणी एखाद्या वस्तू प्रमाणे वागवले जाते म्हणजे त्यांना हार्मोन्स ची इंजेक्शन्स देऊन देऊन दूध वाढीचा प्रयत्न केला जातो.

सार्वजनिक स्वच्छता

आणि जेव्हा सार्वजनिक स्वच्छतेचा विषय येतो त्या ठिकाणी परदेशात अमुक ठिकाणी पहा किती स्वच्छता आहे पण स्वतः जिथे राहतो त्या कॉलोनी मध्ये दहा दिवसांपासून एखादे मॅनहोल उघडे पडलेले असेल आणि जवळच त्याचे झाकण देखील असेल तर ते सुद्धा त्यावर सरकवायचे कष्ट आपण घेत नाही. आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला व आचरणात आणले तरी आपल्या सोबत समाजात लहान मुलांच्या रूपाने नवीन पिढी आपल्या कडे पाहून शिकत व घडत असते त्यांच्यावर ह्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊन आपण आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवू शकतो

काही ठिकाणी एका दोघांच्या सहकार्याने गोष्टी बदलत नाहीत तेव्हा संघटनाने बदल घडवायची इच्छा ठेवावी अश्याच दृष्टिकोनातून आज ह्या लेखातून मी आपणा सर्वांचे संघटन मिळवू इच्छितो आहे आज आपल्या अवती भोवताली ज्या गौ माता रस्त्यावर पडलेले अन्न खाताना दिसल्या व बहुतांश वेळा तेथे मानवी कचरा म्हणजे प्लास्टिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही व ह्याच कचऱ्या मुळे गायींना विविध आजार होऊन अत्यंत वेदना सहन कराव्या लागू शकतात.

आपण ह्या बाबत एक राष्ट्रीय स्तरावर आवश्यक अशी योजना आखण्याची आवश्यकता आहे ज्यामध्ये अश्या शक्यते पासून गायींना कायमस्वरूपी व उत्तम नियोजनात्मक केअर मिळेल तर माझ्या सोबत ह्या अभियानात सर्वानी शामिल व्हा व जास्तीत जास्त हा विचार इतरांपर्यंत पोहोचावा येथे प्रसिद्धी हा उद्येश्य नाहीये त्यामुळे फक्त ‘विचार’ हा शब्द वापरला कुठलेही लेखाची लिंक शेयर करू नका किंवा काही नाही फक्त मी मांडलेला विचार वाचा आपले मत कमेंट मध्ये कळवा काही माझ्या कडून चूक झाली असेल तर नाकी सांगा व पटलेला विचार फक्त इतरान सांगून त्यांनाही ह्या अभियानाचा भाग करून घ्या व त्यांच्या मार्फत ही विचारांची साखळी पूर्ण भारतभर पसरू द्या.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.