Home / विचारवेध / आपण खरचं साक्षर आहोत?

आपण खरचं साक्षर आहोत?

शैक्षणिक साक्षरता आणि सामाजिक साक्षरता यातील फरक दर्शवणारे चित्र - आपण खरंच साक्षर आहोत का? (Illustration showing the difference between educational literacy and social literacy in Marathi.)

गुणहीन साक्षरतेचा आग्रह ?

वाचकहो, नमस्कार! भाषा समजून घेऊन आपल्याला लिहिता वाचता यायला लागले की आपण साक्षर ठरतो आणि ही निश्चितच आनंदाचीच गोष्ट आहे की लिहिता वाचता येते. आणि याविषयी तिळमात्र शंका नाही की देशपातळीवर जो साक्षरतेचा आग्रह धरला जातो तो कशा साठी किंवा हे किती आवश्यक आहे त्याबद्दल कारण, लिहिणे, वाचणे, संख्या गणित करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे तसा आग्रह धरला देखील पाहिजे पण, सोबतच आपण शिक्षणाचा आग्रह का धरत नाही.? गोंधळलात ना? चला तर मग आज बोलूयात या विषयावर.

पूर्वी साक्षरतेची व्याख्या फक्त ७ वर्षावरील व्यक्ती भाषा समजून घेऊन लिहू व वाचू शकत असल्यास त्यास साक्षर समजले जाई आज विविध महत्वाकांक्षी योजने अंतर्गत याची व्याप्ती वाढवत विविध पैलू एकत्र करून साक्षरतेची व्याख्या विस्तृत करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे या विषयी कौतुकच आहे. पण डिजिटल साक्षरता किंवा आज रोजीच्या धोरणात्मक कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान, महत्वपूर्ण जीवन कौशल्ये ,व्यावसायिक कौशल्य विकास, मूलभूत शिक्षण, निरंतर शिक्षण ही सर्व शिक्षणाची अतिशय उत्कृष्ट अशी पद्धती जरी असली तरी; माझ्या मते अपूर्ण आहे. 

नम्रता आणि सत्यनिष्ठता

मूळ शिक्षणा विषयी आजपर्यंत जे कोणी थोर विचारवंत किंवा समाजसुधारक होऊन गेले त्यांनी वेळोवेळी एका गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधले आणि ते म्हणजे ‘गुणसंपन्न साक्षरता’ अर्थात हा शब्द माझा आहे पण, जे काही विचारवंतांचे विपुल लेखन आहे. त्यामधील सार जर आपण पाहिले तर गुणात्मक शिक्षण पद्धतीवर त्यांचा विशेष भर होता. बरं जे भारतात विचारवंताचे विचार होऊन गेले तसेच परदेशातही असे विचार व त्यावर विपुल लेखन झालेले आहे.

वरील वाक्यांचा आपण जरा गांभीर्याने विचार करायलाच हवा. कारण समाजात असलेली असहिष्णूता, वाढती गुन्हेगारी तसेच छोट्या छोट्या गोंष्टीना लक्षात घेतले तरी जसे वाहन चालवताना हलगर्जी पणा, जागोजागी थुंकणे, कचरा टाकणे हे पाहता लक्षात येते की, ह्या गोष्टी कदाचित पूर्णपणे नाहिश्या करता येणार नाहीत पण निश्चितच यामध्ये लक्षणीय घट मात्र करता येऊ शकते. पण याकरिता आवश्यक आहे ते म्हणजे “नम्रता व सत्यनिष्ठता गुणांनी परिपूर्ण शिक्षण पद्धती ज्यात सध्याच्या कौशल्यपूर्ण शिक्षणा सोबत सामाजिक कर्तव्ये, जबाबदारीचे असलेले भान प्रत्येकात विकसित करणे यालाच माझ्या दृष्टीने – गुणसंपन्न साक्षरता” म्हणता येईल. आणि म्हणले गेले आहेच ना :

तेव्हा, जपानसारख्या किंवा इतर प्रगत देशांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, आपण आपल्या भारतातील शिक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करायला काय हरकत आहे? हे नाकारता येणार नाही की, आपली सध्याची शिक्षण पद्धती बऱ्याच अंशी इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि केवळ ‘कारकून’ घडवण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थेवर आधारलेली आहे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही आपण तीच साचेबद्ध पद्धत अनेक दशके पुढे ढकलत राहिलो.

आजघडीला आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्नच होत नाहीत, असे माझे मुळीच म्हणणे नाही (सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण हे त्याचेच एक उदाहरण आहे). परंतु, ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला?’ या म्हणीप्रमाणे आजची प्रत्यक्ष परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर आहे. ज्या भारतभूमीत एकेकाळी तक्षशिला आणि नालंदासारखी जागतिक कीर्तीची विद्यापीठे होती आणि जिथे केवळ ज्ञानाची पूजा केली जायची, तिथे आज शिक्षणाचे जे उघड व्यापारीकरण झालेले दिसते, ते पाहून एक सुजाण नागरिक म्हणून मन खरोखरच खिन्न होते.”

मी समजू शकतो की, जसे साक्षरता मोजता येते तशी गुणवत्ता मोजता येत नाही आणि ह्या अडचणीला समोरे जर कोणी गेले असेल तर मला वाटते जपान ह्या देशाने ह्यावर निश्चितच पूर्ण प्रयत्न केले आहेत. जपान मध्ये शिक्षण क्षेत्रातील पॉलिसी ठरवताना

ज्ञानाआधी संस्कार (Manners Before Knowledge): जपानमध्ये पहिली ते चौथीपर्यंत (वयाची १० वर्षे पूर्ण होईपर्यंत) विद्यार्थ्यांच्या कोणत्याही मोठ्या लेखी परीक्षा घेतल्या जात नाहीत. या सुरुवातीच्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेण्याऐवजी त्यांच्यात चांगली वागणूक, नम्रता, प्रामाणिकपणा, इतरांबद्दल आदर आणि निसर्गावर प्रेम करण्याची वृत्ती विकसित करण्यावर पूर्ण भर दिला जातो.

नैतिक शिक्षण (Dōtoku): जपानच्या अभ्यासक्रमात ‘दोतोकू’ (Dōtoku) म्हणजेच ‘नैतिक शिक्षण’ हा एक स्वतंत्र आणि अनिवार्य विषय आहे. यात केवळ पुस्तकी धडे नसून, प्रसंग देऊन त्यावर विचार करायला लावला जातो.

स्वच्छतेतून नम्रतेचा धडा (O-soji): जपानच्या शाळांमध्ये सफाई कामगार नसतात. विद्यार्थी आणि शिक्षक रोज ठराविक वेळ काढून स्वतःचे वर्ग, शाळेचा परिसर आणि अगदी स्वच्छतागृहे (Toilets) एकत्र मिळून स्वच्छ करतात. या एका कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये ‘कोणतेही काम हलके नाही’ ही भावना आणि ‘नम्रता’ मुळापासून रुजवली जाते.

एकत्रित भोजन आणि कृतज्ञता: शाळेत विद्यार्थी स्वतः आपल्या वर्गमित्रांना जेवण वाढतात आणि सगळे एकत्र बसून जेवतात. जेवणाआधी अन्नाविषयी आणि ते बनवणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. यातून समता आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार होतात.

वाचायला छान वाटते ना? पण ही पद्धत आपल्याकडे राबवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांची नाही, तर संपूर्ण ‘शिक्षण व्यवस्थेची’ मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अनेक शिक्षकांनी मुलांची आयुष्ये घडवली आहेत, हे नाकारता येणार नाही. पण आजच्या वाढत्या व्यावसायिक स्पर्धेत आणि मूल्यांच्या ऱ्हासामुळे काही वेळा लहान मुलांना मारहाण होण्याच्या किंवा काही दुर्दैवी घटनांच्या बातम्या कानावर येतात, तेव्हा मन विषण्ण होते. म्हणूनच, या व्यवस्थेत केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा पुन्हा एकदा संस्कारांची आणि नैतिकतेची जोड देणे काळाची गरज बनली आहे.

आता आपण पाहिलेच बोललो त्याप्रमाणे, ‘गुण कसे देणार की तुम्ही खरच चांगले आहात?’ तर जी पद्धत त्यांच्या कडील मुलांकरिता आहे तीच पद्धत कौतुकास्पद आहे असे वाटते.

नम्रता, प्रामाणिकपणा किंवा सत्याग्रही वृत्ती याचे मोजमाप कारणे शक्य नसते यामुळे जपान मध्ये मार्कांऐवजी निरीक्षणावर भर दिला जातो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या रोजच्या वागणुकीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करतात. विद्यार्थी सगळ्यां मध्ये कसा वागतो, इतरांना मदत करतो का, शाळेच्या मालमत्तेची काळजी घेतो का, या नोंदी ठेवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये या वागणुकीबद्दल शिक्षकांचा सविस्तर अभिप्राय असतो, आकडेवारी नाही याला खऱ्या अर्थाने गुणात्मक मूल्यमापन केले असे म्हणता येईल.

आणि जपानमध्ये या शिक्षणाचे खरे मोजमाप शाळेच्या चार भिंतीत नाही, तर त्यांच्या समाजात होते असे मला वाटते कारण समाजातील वर्तन हीच खरी परीक्षा असे म्हणता येईल शेवटी आपण सर्व जण आज इंटरनेट च्या माध्यमातून पाहतो की, जपान मध्ये रस्त्यांवर कचराकुंडी नसूनही रस्ते अतिशय स्वच्छ असतात. तसेच भूकंप आणि जपान चे नाते खूप जवळचे आहे नेहमीच भूकंप येत असतात अश्या वेळी भूकंप किंवा त्सुनामीसारखी भयंकर आपत्ती आल्यावरही लोक अन्न किंवा पाण्यासाठी झुंबड न उडवता शांतपणे रांगेत उभे राहतात आणि, ही गोष्ट निश्चितच साधी नाही.

आणि मग आपल्याला कदाचित अवघड वाटेल पण रेल्वे किंवा सार्वजनिक ठिकाणी जपान मधील लोक ज्या पद्धतीने शांतता पाळतात ही गोष्ट त्यांच्या साठी काही मोठी वाटण्याचे कारण नाही कारण जी व्यक्ती भूकंपात देखील स्वत: च्या मूल्यांची शिकवण जोपासते ती साध्या-साध्या गोष्टींमध्ये कशी विसरेल.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Home
Search
Menu
×