Home / विचारवेध / Decision घेताना बुचकळ्यात पडता तर ही कविता वाचा : सत्य संकल्पे शुभ प्राप्ती

Decision घेताना बुचकळ्यात पडता तर ही कविता वाचा : सत्य संकल्पे शुभ प्राप्ती

AI Image

Decision ( निर्णय किंवा संकल्प ) कसे घ्यायचे किंवा डिसीजन घेऊन काम करणे किती महत्वाचे :

आज आपण आणखी एका सुंदर कवितेची ओळख या ठिकाणी करून घेत आहोत. कवितेचे लेखक, ज्यांनी आपल्या मुलाकरिता मार्गदर्शक ठरावी अशी ही कविता लिहिली आहे. यांचीच एक हिंदी भाषेतील दुसरी कविता देखील आपल्या याच संकेतस्थळावर आहे. हिंदीतील बेटा-तुझे सुरज कहूं या चांद ही कविता देखील त्यांच्या मुलासाठी लिहिलेली असून ह्या कविते सारखीच ती कविता देखील त्यांच्याच नव्हे तर सर्व अबाल-वृद्धांकरिता प्रेरक व बोधपर ठरेल अशीच आहे.

कामाच्या एकूण गुणवत्तेच्या व पूर्णतेच्या दृष्टीने कुठल्याही कामाच्या आधी त्या कामाचे योग्य नियोजन असणे अति आवश्यक असते. पण यात कुठेतरी नवीन पिढीला आपण आपल्याला मिळालेले संस्कार देताना कमी पडू नये म्हणून लेखकाने एक व्यापक दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असे संकल्पाचे ( निर्णय घेण्याचे ) महत्व स्पष्ट करून सांगितले आहे.

लेखकाचा हा प्रयत्न नक्कीच काळजाला भिडणारा तर आहेच, पण सोबत समाजाची आजची गरज पूर्ण करणारा पण आहे. समाजात नवी पिढी दिशाहीन होत कामा नये. आजची तरुणाई अनेक चुकांतून शिकते हे ठीकही आहे पण काही चुका घडल्यानंतर शिकवण जरी मिळाली तरी आयुष्य पहिल्या सारखे राहत नाही आणि संधी देखील पहिल्या सारख्या राहत नाही.

ह्या चुका माणसाला होत्याचे नव्हते करून सोडू शकतात. लेखकाने ह्याच चुका टाळण्यासाठी समाजाला दिशा देणारे काव्य रचले आहे. मला लेखकाची ही रचना खूप भावली म्हणून kridavishwa.in च्या सर्व वाचकांसाठी ही कविता पुढे देत आहे.

मराठी कविता – सत्य संकल्पे शुभ प्राप्ती

थेट विश्लेषण येथे वाचा

विना संकल्प कार्य सिद्धी कशी 
परी संकल्पाची शक्ती कशात बरी
संकल्प असावेत सदा सत्य 
अनंत लोभाहूनी परी ते पक्व
वर्ष नवे की असे शुभ मुहूर्त 
सत्य संकल्प ते सदा निर्विघ्न
कोणाची मग का बरे भीती 
सत्य संकल्पे निश्चित शुभ प्राप्ती
परी यत्न ते असावे भगीरथ 
नित्य यत्न ते सदा फलप्रद
योग्याची जशी समाधी पवित्र 
तशी आहुती यत्नांची अवश्य
जरी घडे कर्म-फळास विलंब 
श्रद्धा घडावी नित्य अवलंब
कार्य सिद्धीस शक्ती अवश्य 
शक्ती केवळ मनोनिग्रहाने शक्य
मनोनिग्रह जो दिसे अशक्य 
परमेश्वर तो केवळ सत्य

-T.Vishal

विश्लेषण

आता पुढे विस्ताराने कवितेचे विश्लेषण पाहू :

पहिल्या कडव्यात : प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी किंवा कोणाच्या आयुष्यात कदाचित बऱ्याच वेळेस अशी मानसिकता होते की, काम करायची इच्छा देखील आहे, प्रयत्न देखील आहेत; नाही असे काही नाही पण यश येत नाही. अशावेळी लेखक संकल्प/ निग्रह/ निश्चय विषयी आपले मत अधोरेखित करीत आहेत. संकल्पाची आवश्यकता आणि संकल्पाची ताकद पटवून देण्या साठी लेखकाने उदाहरणे तर दिले आहेतच पण संकल्प करताना काय महत्वाचे आहे हे देखील विशेषत्वाने सांगत आहेत.

दुसऱ्या कडव्या मध्ये लेखक संकल्पाची ताकद स्पष्ट करताना असे सांगत आहेत की ठरविल्या शिवाय कोणतेही कार्य आपोआप होणार नाही. आणि कुठलाही निश्चय करते वेळेस लेखक “संकल्प असावेत सदा सत्य” असे जेव्हा सांगतात तेव्हा लेखकास अभिप्रेत सत्य ह्या शब्दाचा अर्थ आपण कोणता घ्यावा यावर माझे मत असे आहे की “चांगला” हा सरळमार्गी अर्थ जरी निघत असला तरी पहिल्या दोन ओळीतील दुसरी ओळ “अनंत लोभहूनी परी ते पक्व” असे जेव्हा म्हणतात त्यावरून सत्य ह्या शब्दाचा अर्थ फक्त “चांगला” एवढाच घेऊन जमणार नाही तर या ठिकाणी सत्य ह्या शब्दाचा पूर्ण अर्थ लेखकास काय अपेक्षित आहे हे कदाचित आपल्यालाही लक्षात येणार नाही म्हणून लेखक पुढील कडव्यांत तो स्पष्ट करताना दिसत आहेत. आणि आपण सध्या लेखक घेऊन जात असलेल्या सत्य शोधाच्या प्रवासात तात्पुरता अर्थ चांगलाच घ्यावा असे मला वाटते.

तिसऱ्या कडव्या मध्ये लेखक सामाजिक मानसिकतेचा अचूक आढावा घेताना दिसून येत आहेत बऱ्याच वेळा आपण बघतो आपल्या पैकी बरेच जण कुठलेही कार्य करायचे असल्यास दिवस, वेळ, मुहूर्त पाहत असतात आणि श्रद्धेने असे करणे केवळ योग्यच आहे परंतु कधी त्या गोष्टीचा अतिरेक जर झाला तर अति तिथे माती या न्यायाने परिस्थितीचे किंवा परिस्थितीने आपले हसू केल्याचे आपण पाहिले असेलच, काही लोक काही शुल्लक गोष्टी करिता देखील वेळ पाहत बसतात तो त्यांचा वयक्तिक विषय आहे पण काहीवेळा आणीबाणी च्या वेळेस देखील मुहूर्त पाहून जर स्वत:चे किंवा दुसऱ्याचे नुकसान होत असेल तर तिथे लेखक “सत्य संकल्प ते सदा निर्विघ्न” सांगून याठिकाणी सत्याचा अर्थ आपल्या स्वत: च्या चांगल्या विषयीच नाहीत तर येथे लोकहिताचा देखील विचार करत आहेत असे मला वाटते सोबतच असे संकल्प किंवा संकल्प युक्त कार्य स्थळ-वेळ-काळ न पाहता केले तरी त्यास विघ्नांची बाधा पोहणार नाही असे सांगत आहेत.

चौथ्या कडव्या मध्ये लेखक वरील शुभ अशुभ विषयी आपले विचार मांडत असताना समाज मनाचा ठाव घेणारे अजून खोलवर विचार व्यक्त करताना दिसून येत आहेत. जसे बऱ्याच वेळा आपण तिसऱ्या कडव्याच्या विश्लेषणात पाहिल्या प्रमाणे बरेच जण परिस्थिती समोर अडून बसतात आणि हसू करून घेतात पण काही जण मात्र जाऊ दे म्हणून दुसरा मार्ग शोधतात किंवा प्रसंगावधान राखून संकल्प अथवा संकल्प युक्त कार्य तर करतात पण नंतर मनात कुढत बसतात की आता आपण वेळ काळ पाहिली नाही, मुहूर्त पाहिले नाही आता काय होणार तेव्हा अशावेळी “सत्य संकल्पे निश्चित शुभ प्राप्ती” असे आपल्या मुलास मार्गदर्शन करताना लेखक नेमके असे सांगत आहेत असे मला वाटते कि, जर तुझा संकल्प/ निश्चय/ मनोनिग्रह जर फक्त स्वत : चे हित पाहणारा नाही आहे तर मुहूर्तांची भीती बाळगू नकोस त्यातून फक्त शुभ फळच म्हणजे परिणाम हातास येईल.

पाचव्या कडव्या मध्ये लेखक अत्यंत महत्त्वाचे असे मार्गदर्शन आपल्या मुलास करताना दिसून येते जेव्हा मागील म्हणजे चौथ्या कडव्यात सत्य संकल्पातून निश्चित शुभ परिणाम मिळतील असे सांगणारे लेखक या ठिकाणी एक डोळस दृष्टिकोन आपल्या मुलास देण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्यात त्यांचे म्हणणे माझ्या मते असे आहे की, सत्य म्हणजेच चांगला व परोपकारी विचार ठेवून जर संकल्प केला तर येणारे परिणाम शुभ असतील पण म्हणून संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न / कार्य करण्याचे टाळून नुसतेच चांगल्या कामासाठी संकल्प केला म्हणजे तो आपोआप पूर्ण होईल असे विचार करणे देखील अयोग्य असल्याचे लेखकास या ठिकाणी सांगायचे आहे. पण मग प्रयत्न एकदा केला आणि सोडून दिला असेही नाही तर नित्य यत्न म्हणजेच प्रयत्नांत सातत्याची गरज असल्याचे देखील सांगत आहेत.

सहाव्या कडव्या मध्ये लेखक पाचव्या कडव्याचा संदर्भ घेऊन माझ्या मते पुढे असे सांगत आहे की, एखादा योगी जसा समाधी मध्ये असतो किंवा समाधिस्थ होतो अशावेळी त्यांची समाधी म्हणजे त्यांनी केलेल्या यम-नियमांचे काटेकोर पालन तसेच पवित्र उद्देश्याचे फळ असते अशा वेळी आपली संकल्प पूर्ती करिता केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नां मागील मनोभूमिका काटेकोर व पवित्र असावी आणि नजर फळा / परिणामां कडे नसावी कारण योगी देखील समाधी आता लागेल नंतर लागेल या विवंचनेत नसतो तसेच त्यांची त्यांच्या नियमाधिष्टित चित्तवृत्तीवर संपूर्ण श्रद्धा असते. त्याप्रमाणे आपले संकल्प योग्य असतील तर संकल्प पूर्ण करताना कुठल्याही विवंचनेत न राहता फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करत राहणे हा मार्ग लेखकास या ठिकाणी सुचवायचा आहे असे मला वाटते त्यासोबतच आहुती हा शब्द लेखक जाणीवपूर्वक या ठिकाणी वापरताना दिसत आहेत ज्यानुसार फक्त यज्ञातील सातत्याने दिल्या जाणाऱ्या आहुत्यांच्याच बाबत नव्हे तर आधीच्या ओळीमधील योगी तसेच समाधी यानुषंगाने एकूण एकंदर यज्ञ संकल्पनेचा देखील संदर्भ या ठिकाणी देऊन कर्मकर्तव्या विषयी एक सर्वोच्च भावना रुजवण्याचा प्रयत्न इथे केल्याचा वाटतो.

सातव्या कडव्या मध्ये लेखक आधीच्या कडव्या मध्ये मांडलेली मनोभूमिका अजून प्रगल्भ करण्या साठी येथे स्पष्टच सांगत आहेत की, जरी आपली भावना वरील पैकी सर्वोच्च गुणवत्तेची असून जर संकल्पाच्या सिद्धीस/ पूर्ततेस म्हणजेच केलेल्या कामाचे फळ मिळण्यास जरी उशीर झाला तरी योगी यांच्या त्यांच्या नियमाधिष्टित चित्तवृत्तीवर असलेल्या श्रद्धे प्रमाणे आपली सत्य संकल्प पूर्ती करिता आवश्यक कार्य करण्यावर श्रद्धा ठेवावी आणि संकल्प पूर्तीचाच फक्त विचार मनी ठेवावा, अन्य दुसरा विचार नसावा.

आठव्या कडव्या मध्ये लेखक कार्य सिद्धीस लागणाऱ्या बळाची पूर्तता मनोनिग्रहाने पूर्ण होऊ शकते असे सांगतात कारण कुठलेही कार्य हे करण्यासाठी आपण संकल्प / मनोनिग्रह उराशी बाळगतो पण जर शारीरिक ताकद आपल्या जवळ किती आहे याचे कुठे मोजमाप असते आणि जरी असले तरी त्यावर किती अवलंबून राहावे कारण त्याची अचूकता खरी असण्याची शक्यता फार कमीच असू शकते. त्यामुळे त्याविषयी आपल्या जवळ ठोस उत्तर नसते पण आपली खरी ताकद ओळखण्या साठी सत्य संकल्पाची आपल्याला मदत होऊ शकते किंवा सत्य संकल्पाने आपल्यास बळ देखील मिळते असे बहुधा येथे लेखकास सुचवायचे आहे असे मला वाटते.

नवव्या कडव्या मध्ये म्हणजेच कवितेच्या शेवटच्या कडव्यात लेखक सामान्य व्यक्तीच्या मनाचा अचूक वेध घेताना दिसून येत आहेत. जेव्हा एखाद्या कामासाठी आपण आपल्या जीवाची चिंता सोडून पूर्ण पणे कामात झोकून देतो आणि तरीदेखील एखादे काम अशक्य वाटू लागते अशावेळी पूर्वीच्या म्हणजेच आठव्या कडव्यात लागणाऱ्या बळाची आपण चर्चा केली त्याप्रमाणे आपल्या संकल्प शक्ती ला देखील ग्रहण लागल्या सारखे वाटू लागते अशा वेळी शेवटच्या ओळीत लेखक “परमेश्वर तो केवळ सत्य” म्हणून अशावेळी अत्यंत खुबीने व मार्मिक पद्धतीने आपल्यासमोर दोन अर्थात कवितेचा शेवट करत आहेत ज्यातील पहिला अर्थ म्हणजे अशावेळी फक्त परमेश्वर आपणास बळ देऊ शकतो व सत्य संकल्प सिद्धीस जाऊ शकतो. दुसरा अर्थ म्हणजेच सुरवातीच्या कडव्यांत आपण सत्य या शब्दाचा लेखकास अपेक्षित अर्थ शोधला तो म्हणजेच चांगला व परोपकारी उद्देश्य हा आहे असे आपल्याला वाटते परंतु कदाचित लेखकास त्या शब्दाच्या अर्थाच्या सीमा अजून विस्तारित वाटतात आणि म्हणून सत्य म्हणजेच परमेश्वर असेही त्यातून सुचवून लेखक स्वत: “सत्य” या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून नुसती कविता स्पष्ट रूपाने समजावीत आहेतच परंतु सोबतच आपल्या दैनदिन जीवनात आपल्याला विचार करायला देखील लावत आहेत. आणि सत्य ह्या शब्दाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन प्रत्येकाच्या मनात ह्या कवितेचे पुढचे कडवे जणू रचत आहेत असेच वाटते.

Tagged:

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.