Home / विचारवेध / kridavishwa.in मार्फत एक हितगुज

kridavishwa.in मार्फत एक हितगुज

एका रस्त्यावर मोबाईल च्या मागे जाणारी माणसे

Kridavishwa.in च्या वाचकांना सप्रेम नमस्कार 🙏

Kridavishwa.in चे वाचकहो नमस्कार, क्रीडाविश्व म्हणले की खेळ आणि खेळ जगताच्या बातम्या असा समज होणे स्वाभाविक आहे. पण हे नाव घेण्या मागे आमचा हेतू असा आहे की, विश्व म्हणजे या जगात प्रत्येक जण खेळ खेळत आहे, कोणी चांगला तर कोणी वाईट चांगल्या खेळाचे कौतुक होते आणि वाईटाला शिक्षा पण, ह्या सर्व खेळा कडे म्हणजेच लोकांच्या कृती कडे बातम्या तटस्थ पणे वृत्त सादरीकरणाचे काम करत असतात.

आणि ज्याचे आपण सर्व जण समर्थन देखील करतो. पण ह्या सर्व पसऱ्यात आपण कुठे तरी भावना शून्यतेकडे वाटचाल करत आहोत का?, असा प्रश्न आज च्या सामाजिक घटनांना पाहून प्रत्येकाला पडतो. ह्याला वृत्त वाहिन्या जबाबदार आहे असे मी मुळीच म्हणत नाही. तर मग असे का होते ह्यावर बरीचशी उत्तरे मिळतील आणि ते बरोबर देखील असतील पण नुसते कारण शोधून उपयोग नाही तर त्यावर उपाय काय करू शकतो असा विचार येणे स्वाभाविक आहे असे मला वाटते.

त्यामुळेच, आजच्या या युगात इंटरनेट आणि मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो, तर याच तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून यशाची शिखरे गाठणारेही कमी नाहीत. अशा वेळी तंत्रज्ञानाची भीती बाळगण्यापेक्षा, त्याचा वापर सकारात्मकतेसाठी कसा करावा, हे ठरवण्याची वेळ आज आपल्यासमोर आली आहे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजात वाढतो आणि त्याचे एक घटक बनतो. आजच्या या वेगवान दुनियेत रोज नवनवीन आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात; पण दुर्दैवाने सगळंच चांगलं असतं असं नाही. संतांच्या, थोर समाज सुधारकांच्या या महाराष्ट्रात एका बाजूला अभिमानाने मान उंचावेल अशी कर्तबगिरी गाजवणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला समाजाला घातक ठरणारे घटकही आहेत. अशा नकारात्मक प्रवृत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि समाजात सुजाण नागरिक निर्माण करण्यासाठी केलेला हा एक छोटासा वैचारिक प्रयत्न आहे.

प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा आपण अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण जसे आजारपणावर उपचार व पुन्हा आजारपण येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय केल्याशिवाय निरोगी आयुष्याचा आंनद घेऊन जगता येत नाही, तसेच सामाजिक प्रतिकूलतेवर उपाय म्हणजे सुजाण समाजाची निर्मिती करणे हाच आहे.

आपल्या आजूबाजूला रोज वाईट गोष्टी ह्या घडत आहेतच आणि अश्या घटना घडणे पूर्णपणे कधी थांबतील हे देखील सांगणे कोणाला शक्य आहे असे मला तरी वाटत नाही. आणि रोज तसेच नेहमी औषध घेतल्या सारखे आपल्या कानावर ह्या बातम्या पडतात आणि प्रत्येकाची मानसिकता एखाद्या पिक्चर मध्ये “Viewer discretion advised” म्हणल्या सारखे सूचना देऊन काम भागात नाही. तर मला ह्यावर उपाय म्हणजे ह्यास तोडीस तोड दुसरे औषध सुरू करण्याचा विचार योग्य वाटतो.

म्हणजेच ‘मूळ पत्रकारिता‘ ह्या क्षेत्रात ज्या बातम्या सांगितल्या जातात त्या जश्या प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे तसेच ह्याच मूळ पत्रकारितेचा सख्खा आणि माझ्या मते अत्यंत आवश्यक असा भाऊ म्हणजे ‘ओपिनियन जर्नलिझम‘ देखील तितकाच प्रत्येकाच्या आयुष्यात आवश्यक आहे. ह्या ओपिनियन जर्नलिझम क्षेत्रा मार्फत जो भावनात्मक दृष्टिकोन मिळतो तो सामाजिक अकल्पनीय घटनांमुळे एका विचलित व विस्थापित मनाला कौटुंबिक आधारा सारखे बळ द्यायचे काम करतो. तर चांगल्या घटना मांडत असताना एखाद्या मित्रासारखे हे क्षेत्र गुणात्मक वेळ आपल्यासोबत घालवते असेच वाटते.

आपण रोज अनेक बातम्या वाचतो, व्हिडिओ पाहतो आणि कळत-नकळत आसपासच्या घडामोडींवर लक्ष ठेवत असतो. वृत्तपत्रे किंवा न्यूज चॅनेल्स बातम्या सांगताना तटस्थ भूमिकेतून facts मांडत असतात, जे त्यांच्या कामासाठी आवश्यक आहे. परंतु, आज या तटस्थ बातम्यांमध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बातम्यांचा भरणा जास्त असतो.

अशा वेळी नवीन पिढीला फक्त चांगल्याच वातावरणात ठेवून जगापासून अलिप्त ठेवण्यापेक्षा, अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर एका घरगुती आणि सुसंस्कृत वातावरणात चर्चा होणे आवश्यक आहे. सोबतच चांगल्या घटना घडलेल्या सांगणे, त्यांना प्राधान्याने समोर आणणे, त्यांचा ऊहापोह करणे, तसेच चांगल्या जीवनशैली ची कास धरणे हे अत्यंत आवश्यक आहे. याच विचारातून या आगळ्यावेगळ्या ब्लॉगची सुरुवात होत आहे.

आता मुख्य विषयावर येऊ; या ब्लॉगमध्ये आपणास काय मिळेल?  इथे आपण रोज विविध घटना, कला आणि चालू घडामोडींच्या ‘समीक्षणा’च्या माध्यमातून आपण जोडले जाऊ. पण म्हणजेच काय तर थोडक्यात, kridavishwa.in ह्या व्यासपीठावर आपल्याला:

  • सर्वत्र चर्चित अश्या सर्व चांगल्या व आवश्यक घटनांच्या क्षेत्र व भाषेच्या कुठल्याही सीमा न ठेवता पूर्ण माहिती घेऊन तुमच्या पर्यंत आणण्याचा kridavishwa.in चा प्रयत्न असेल.
  • विचारवेध‘ : ‘विचारवेध’ ह्या संपादकीय प्रभागात आपल्याला विचारधन म्हणजेच चालू घडामोडींवर वयक्तिक दृष्टिकोनातून सविस्तर अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो तो वाचायला मिळेल.
  • अपडेट‘ : बातम्यांसारखेच ह्या प्रभागात सर्व चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल व आपला एक मित्र म्हणून यातील मला व माझ्या टीम ला आवडलेल्या चांगल्या बातम्यांपैकी आपल्या करीता शक्य तेवढ्या बातम्यांवर विचारातून थोडक्यात व्यक्त होण्याचा व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आपणाला पाहण्यास मिळेल.
  • तंत्रज्ञान‘ : आधुनिक जगात तंत्रज्ञानाची माहिती ठेवणे हे जणू पाणी पिण्या इतके आवश्यक आहे असे म्हणले तर वावगे ठरू नये. अश्या वेळी जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील चालू घडामोडींच्या बाबतीत एक वयक्तिक दृष्टिकोनातून माहिती व फायदे-तोटे सांगण्याचा केलेला प्रयत्न पाहायला मिळेल.
  • जीवनशैली‘ : ‘साधी राहणी उच्च विचार’ चा खरा अर्थ समजून घेत आधुनिकतेचा चांगल्या ठिकाणी वापर करत केलेल्या बदलला स्वीकारणे व जीवनमान व आरोग्य सुधारणे करीता तसेच एकंदर lifestyle विषयक माहिती वयक्तिक दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळेल.
  • मनोरंजन‘ : सततच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा नसेल तर शरीर जरी आराम केल्यावर पुन्हा कामासाठी तयार होईल पण मनाला पुन्हा ताजेतावाने करण्या साठी हेल्दी मनोरंजना कुठे बघायचे असेल ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळेल.

आपला स्नेह आणि पाठिंबा असाच कायम राहावा हीच विनंती! आमची विस्तृत भूमिका समजून घेण्या करिता आमच्या बद्दल (About Us) पानावर नक्की भेट द्या.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.