थोडक्यात :
Acidity चे खरे solution काय वाचा सविस्तर लेख
Acidity ज्याला मराठीत ‘आम्लपित्त’ म्हणतो असे हे आम्लपित्त कोणाला होत नाही असे नाही तर सर्वांनाच याचा त्रास कमी फार प्रमाणात होतो, आयुर्वेदाच्या दृष्टीने आम्लपित्त हे पाचन संस्थेच्या बिघाडामुळे होते. कफ , वात , पित्त पैकी पित्त गुणात आम्लाची मात्रा वाढणे म्हणजे आम्लपित्त होय. आणि त्रास होतो म्हणजे काय होते तर;
Acidity (आम्लपित्ता) ची लक्षणे :
- मळमळ होणे
- डोकेदुखी
- पोटात जडपणा
- आंबट ढेकर येणे
- छातीत जळजळ होणे
- उलटी होणे
- अशक्तपणा येणे
आता वरील लक्षणे वाचल्यावर आपल्या लक्षात आले असेल की बऱ्याचदा आपल्याला देखील असा त्रास झाला आहे. पण चुकीच्या आचार व आहार पद्धती मुळे असे होते हा त्रास बहुतांशी लोकाना किंवा कमी वयातील लोकाना त्या तुलनेने कमी होतो, पण नियमित पणे शरीराकडे झालेले दुर्लक्ष ह्या आजाराला कारणीभूत ठरते.
आता त्रास कमी असेल तर फारसा फरक पडत नाही असेच सगळ्यांना वाटेल पण प्रत्येक गोष्टीचा परिणाम शरीरावर होत असतो व कालांतराने याचे पडसाद उमटायला सुरुवात होते.
पण ज्यांना हा त्रास आधीच खूप सतावत असेल म्हणजे वरचेच सर्व लक्षणे पण त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असणे तेव्हा ह्या आजाराकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक असते. थोडक्यात त्रास कमी होत आहे किंवा जास्त, दुर्लक्ष न करता आपल्या प्रकृती नुसार तज्ञांचा सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक असते.
सदर लेख फक्त माहितीकरिता आहे, वैद्यकीय सल्ला तसेच तपासणी किंवा उपचारा करिता तज्ञांना भेटा.
आपण वर या आजाराची लक्षणे पाहिली पण याची कारणे देखील पाहू म्हणजे काय केले नाही तर आपल्याला ह्या त्रासापासून वाचता येईल हे लक्षात येते. पण त्याही आधी कारणे लक्षात घेण्या आधी आम्लपित्ता मध्ये देखील दोन प्रकार आहेत हे आपणाला माहीत होते का? ह्या आजाराची प्रामुख्याने तीन कारणे सांगितली जातात पण, त्या कारणांचा व प्रकारांचा घनिष्ठ संबंध लक्षात घेतल्यास नेमके काय करू नये हे लक्षात घेऊन प्रकृती चे प्रकरण हाताबाहेर जाण्या पासून थांबवता येते.
Acidity चे प्रकार :
- ऊर्ध्वग आम्लपित्त : पोटाच्या वरच्या बाजूस शरीरावर दिसणारा परिणाम हा ऊर्ध्वग आम्लपित्ताचे लक्षण आहे.
- अधोग आम्लपित्त : तर पोट व शरीराच्या खालील बाजूवर दिसणारा परिणाम हा ऊर्ध्वग आम्लपित्ताचे लक्षण आहे.
Acidity चे कारणे
🔥 चुकीचा आहार
- तिखटाचे आहारातील अत्याधिक प्रमाण
- खूप मसालेदार पदार्थ खाणे
- खूप तळलेले पदार्थ खाणे
- नियमित फक्त आंबटच पदार्थ खाणे
- अत्याधिक प्रमाणात चहा, कॉफी चे सेवन (सर्वाधिक धोकादायक ⚠️)
- जंक फ़ूड चे अतिसेवन ( नावातच जंक आहे विचार करा 🤔)
🤢 चुकीचा आचार / जीवनपद्धती
- जागरण करणे
- खूप झोपून राहणे
- अवेळी जेवण करणे
- सतत खात राहणे / भूक नसतानाही खूप खाणे
🎭 मानसिकता
- चिंता
- राग
- भीती
- तणाव
मानसिकते वर नियंत्रण
मानसिकतेचा फक्त एसिडिटीशिच संबंध नाही तर एकूण आपल्या शरीरावर येणाऱ्या आजार रुपी प्रत्येक संकटाशी संबंध आहे, त्यामुळे मानसिकता कशी असावी हे बोलणे सोपे असते पण प्रत्यक्षात करणे अवघड असते याबाबत ‘कळतयं पण वळत नाही’ अशी परिस्थिती असते. कारण अति तणाव किंवा चिंता , राग , भीती या पैकी कुठलेच शरीरास उपायकारक नसून अपायकारक असल्याचे सर्वांना माहीत आहे पण ह्या भावना इतक्या तीव्र असतात की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते.
तेव्हा ह्या बाबतीत शक्य ते उपाय काय करू शकतो यावर विचार केल्यास आपण किमान नियंत्रणाचे प्रयत्न केल्यास आणि त्याचा सराव केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होत असल्याचे दिसून येते. तर उपाय असे करावे की ज्यातून मनाला शांति मिळेल मग जशी प्रत्येकाची मानसिक अवस्था सारखी असू शकत नाही तसेच याचे उपाय देखील सारखे किंवा ठराविक असू शकत नाही माणसाचे मन अत्यंत चंचल स्वरूपाचे असते.
त्यामुळे आजपर्यंत ह्या विषयावर खूप चर्चा – मंथन झाल्या नंतर यात काही गोष्टी सर्वात कारगर ठरल्या त्या म्हणजे प्रवास, छंद, संगीत, अध्यात्म अगदी जशी तीव्रता आहे तसाच क्रम देखील आहे त्यामुळे थोड्या फार अस्वस्थते करिता प्रवास, त्यानंतर जास्त अस्वस्थते करिता छंद व अनुक्रमे अध्यात्मिक उपक्रमात सहभाग पण हा माझा अनुभव आहे आपल्या साठी वेगळा निश्चित असू शकतो. माझ्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे.
गृहीतके
असे सांगितल्या जाते की अति तिखट, मसालेदार, खूप तळलेले पदार्थ खाल्यावर हा त्रास होतो पण असे उत्तर ऐकल्यावर खरे तर मला हसूच येते म्हणजे उत्तर चुकीचे आहे असे मला नाही म्हणायचे किंवा मी काही तज्ञ नाही. पण एवढे लॉजिक तर सर्वच जण लक्षात घेऊ शकतात की ‘अति तिथे माती’ पण त्यातही प्रत्येकाची प्रकृती व मानसिकता ही वेगळी असते व त्यानुसार त्यांची सवय व सहनशक्ती देखील वेगळी-वेगळी असते आणि यात वयाचे सुद्धा गृहीतक धरावेच लागेल.
म्हणजे जे 1 वर्षाच्या बाळास सहन होते त्यापेक्षा जास्त किशोर अवस्थेतील बालकास सहन होते व त्याहून जास्त कुमार अवस्थेतील असेच पुढे जाऊन पुन्हा आलेख खाली यायला सुरुवात होते मग सांगताना कोणी असे सांगू देखील शकत नाही. की अमुक प्रमाणात तिखट, तेल, खा यावर जास्त घेतल्यास त्रास होईल म्हणजे त्यासाठी तुमची पूर्ण केस स्टडी करावी लागेल आणि काही डॉक्टर तितकी मेहनत घेऊन तुम्हाला सांगतात देखील पण कोणी वर वर सांगितले की तिखट कमी करा की लगेच विचारा किती कमी? 🤪
आणि माझ्या बोलण्याचा कुणी असा अर्थ देखील काढू नये की मी (एखादी व्यक्ती ) वयस्क किंवा तरुण आहे म्हणजे कितीही तिखट खाऊ शकते किंवा वरील कारणे सांगितली आहेत त्यानुसार राहू शकते. मला असे मुळीच म्हणायचे नाही पण कुठेतरी स्पष्टता यायला हवी एवढेच म्हणणे आहे.
यावर मतमतांतरे देखील इतक्या टोकाला जातात की काही जण तिखट किंवा मसालेदार खाणे हे मानवी खाणे च नाहीये म्हणतात असो त्यावर नंतर कधी चर्चा करू पण यात आता जर अश्या परिस्थितीचा विचार केला की तुम्ही एकटे आहात/ किंवा प्रवासात आहात / किंवा रात्री उशिरा तुम्हाला अचानक खूप त्रास सुरू झाला तर यावर काही आयुर्वेदात तत्काळ उपचार किंवा एकंदर पथ्य सांगितले आहे का?
Acidity करिता पथ्य , घरगुती उपाय, उपचार
आयुर्वेदात जेवणाच्या वेळा व एकूणच खानपाना विषयी खूप मीमांसा केली गेलीये, आता उगीच हौस आहे म्हणून सतत जंक फ़ूड खाणारे काही फूडप्रेमी असतात तर त्यांच्या विषयी नक्कीच पथ्य पाळणे गरजेचे आहे असे म्हणणे स्वाभाविक आहे. पण आज कित्येक लोक धावत्या ट्रेन सारखे सतत राबत कष्ट करत दोन वेळेच्या जेवणाची सोय लावण्यात गुंतलेले असतात आणि हे वास्तव आहे.
बरेचसे असे म्हणतात एसिडीटी श्रीमंतांचा आजार आहे पण हे पूर्णपणे चुकीचे आहे अती खाण्यामुळे जसे एसिडिटी होते तसे कमी खाण्यामुळे देखील होते. पण आजच्या जग रहाटीत ह्या जुन्या (आयुर्वेदात सांगिलतलेल्या) श्रेष्ठ आचारसरणी चा अवलंब करणे सर्वांना शक्य होईलच असे नाही. तरी काळ बदलला म्हणून शरीर बदलले नाही किंवा शरीराचे नियम बदलले नाही, तेव्हा शक्य होईल तेवढे योग्य आचारसरणी चा अवलंब करणे हिताचे असते.
एसिडीटी करीता पथ्य
- रोज सूर्यास्तापूर्वी जेवण करणे, सूर्यास्तानंतर खाणे टाळा
- तूप, आवळा, मनुका, साळीचा तांदूळ रोजच्या आहारात समाविष्ट करणे.
घरगुती उपाय / तत्काळ फायद्यासाठी
आता वर सांगितलेले एसिडीटी चे प्रकार व त्यानुसार दिसणारे लक्षण असे न बघता दिसणारे लक्षण व त्यानुसार असणारा एसिडिटी चा प्रकार आपण पाहू म्हणजे तत्काळ फायद्यासाठी काय करता येईल हे लक्षात येते. ऊर्ध्वग आम्लपित्त व अधोग आम्लपित्त यात नेमके काय होते हे त्यांच्या नावातून स्पष्ट आहे उर्ध्वग (ऊर्ध्व-गती = वरच्या दिशेने आम्लाची गती असलेला ) म्हणजे यात एसिडीटी वर च्या बाजूस म्हणजे छातीत जळजळ करणे , मळमळ होणे, सतत आंबट ढेकर येणे हे दिसते
तर अधोग आम्लपित्त मध्ये पोटात टोचल्यासारखे दुखणे, शौचास जळजळ होणे, पोट फुगणे (थोडक्यात गॅसेस होणे पण पास ना होणे), चक्कर येणे (पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अशक्त पणा येणे)
आता दोन्ही प्रकारात वर दिलेल्या कारणांमधून पदार्थांचे अतिसेवन केल्याने अश्या प्रकारचे परिणाम हे पाहायला मिळतात पण तत्काळ घरगुती उपाय बघताना थोडे खोलवर विचार करणे आवश्यक आहे कारण कधीकधी एकूण आहाराचे प्रमाण कमीच असते म्हणजे तुम्ही रोज चार चपाती खात असताना आज दोनच खाल्ल्या पण भाजी खूप तिखट असेल तर तेही कारण बनू शकते मग अश्यावेळी उपाय देखील त्यानुसार करावा लागतो.
कमी खाल्याने एसिडिटी झाल्यास
- थंड दूध
- केळी
- नारळपाणी
जास्त खाणे झाल्या मुळे एसिडीटी झाल्यास
- बडीशेप
- जेवणा नंतर गूळाचा एक छोटा खडा खाणे
- कलिंगड आणि खरबूज खाणे
उपाय
सर्व परिस्थिती खालील उपाय कामास येतात ते म्हणजे
- तुळशीची 3 ते 4 पाने चावून खाणे किंवा पाण्यात उकळून ते पाणी पिणे याने एसिडिटी मध्ये लवकर आराम होतो.
- ताक प्यायल्याने देखील आराम मिळतो.
जेवण केल्याबरोबर कधीच लगेच झोपू नका असे केल्याने अपचनाच्या समस्या वाढतात व परिणामी एसिडिटी मध्ये रूपांतर होते. शतपावली व जेवण केल्यावर थोडा वेळ वज्रासनात बसल्याने नक्कीच खूप फायदा होतो.
सदर लेखातील माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने दिली आहे याविषयी माहितीची अचूकता किंवा वयक्तिक प्रकृती परत्वे याचे फरक विषयी आम्ही दावा करीत नाही. योग्य उपचार/ सल्ल्या करिता तज्ञांची भेट आवश्यक असते.
आमचे अस्वीकरण, टर्म एंड कंडीशन तसेच गोपनीयता धोरण वाचा.






