‘इंटरनेट’ कोणी शोधले?
आपण आजच्या काळात इंटरनेट शिवाय कितपत राहू शकतो हा एक मोठ्या चर्चेचा विषय ठरू शकतो पण आपला इंटरनेट चा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे हे निर्विवाद सत्य आहे. 1993 ला जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट सर्वांसाठी खुले झाले आणि त्यानंतर साधारण काही वर्षे इंटरनेट म्हणले की तेव्हा फक्त काही तुरळक लोकं मोठ्या कामांसाठीच आणि तेही मोठ-मोठाल्या कंप्युटर वर इंटरनेट चा वापर करत असत.
आणि आज बदलेली ही परिस्थिती थक्क करणारी आहे. म्हणजे नुसते कंप्युटर प्रगत नाही झाले तर मोबाईल सारखी यंत्रणा येऊन त्यात मोठी आश्चर्यकारक उत्क्रांती झाली आणि आता आपण AI – artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात देखील प्रवेश केला आहे. आणि अतिशय वेगाने प्रगती होत असलेल्या या तंत्रज्ञानात पुढील काळात सर्वांसमोर विपुल प्रमाणात आश्चर्ये आपल्या साठी वाट पाहत असणार यात काही शंका नाही.
तुम्हाला देखील ‘इंटरनेट’ व ‘वेब’ हे एकच आहे असे वाटते का ? तर जाणून घ्या खरा फरक.
आपल्या पैकी बऱ्याच लोकांना इंटरनेट व वेब म्हणले तर एकच वाटेल पण खरच तसे आहे का? किंवा, इंटरनेट चा मूळ उद्येश काय होता आणि वेब ज्याला वर्ल्ड वाइड वेब असेही म्हणतात ते केव्हा सुरू झाले किंवा कोणी केले या विषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे त्या निमित्याने आपण एक प्रकारे त्यांच्या त्यागाची जाण ठेवू शकू असे मला वाटते आणि मला खात्री आहे ज्यांना ही गोष्ट माहीत नसेल त्यांना ही गोष्ट माहिती झाल्या नंतर निश्चितच या सर्व गोष्टी विषयी आपण स्वतः ला नशीबवान समजू.
इंटरनेट व वेब चा इतिहास
इंटरनेट चा शोध 1960 दशकात शीतयुद्धाच्या दरम्यान अमेरिकी लष्कराने लावला. सुरवातीच्या काळात इंटरनेट हे मुलत: ARPANET (ए आर पी ए नेट) असे ओळखले जायचे आणि त्याचा जो शोध अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लावला म्हणजेच याचा अर्थ तो एका व्यक्ती ने लावला नसून त्यास एकापेक्षा अधिक व्यक्तीचे योगदान व संरक्षण विभागाचे संसाधने कारणीभूत होते.
आणि यात मूळ संकल्पना कोणाची होती तर जे.सी.आर. लिकलिडर यांनी गॅलेक्टिक नेटवर्क ची संकल्पना मांडली आणि तिथूनच इंटरनेट च्या जन्माची कहाणी सुरू झाली, नंतर बॉब टेलर यांनी त्या कल्पनेला लष्करी प्रकल्पाचे (आर्पानेट/ए आर पी ए नेट) चे रूप दिले आणि पॉल बॅरन यांनी त्यातील डेटा सुरक्षित पाठवण्याचे ‘पॅकेट स्विचिंग’ चे तंत्र शोधून काढले. पण हे सर्व प्राथमिक रूपातील इंटरनेट चे स्वरूप होते.
इंटरनेट व वेब चा उगम
आणि आज जे इंटरनेट आपण वापरतो त्याची पायाभरणी जर कोणी केली असेल तर त्यांचे नाव म्हणजे विंटन सर्फ (Vint Cerf) व रॉबर्ट कान (Robert Kahn) हे होय कारण त्यांनी 1970 च्या दशकात TCP/IP (Transmission Control Protocol and Internet Protocol) चा शोध लावला ज्यायोगे लष्करी माहिती सुरक्षित राहावी आणि संगणकात समन्वय रहावा हा उद्देश्य साध्य करायचा होता. त्या पेक्षा अधिक उद्देश्य सुरवातीच्या काळात तरी नव्हता. आणि शोध जरी 1970 च्या दशकातील असला तरी अधिकृत रित्या ते 1 जानेवारी 1983 साली वापरात आले.
मग हे झाले मर्यादित स्वरुपाचे आणि मुक्त नसलेले, ज्यावर पूर्णपणे सत्ता प्रशासनाची आहे असे इंटरनेट. आणि मग नाव येते ते म्हणजे ब्रिटिश शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) यांचे यांनी सर्वसाधारण पणे 1989 – 90 मध्ये CERN या युरोपीय न्यूक्लियर संशोधन संस्थेत काम करत असताना वर्ल्ड वाइड वेब (www) चा शोध लावला. त्यांनी html, http आणि वेब ब्राउज़र तयार केले ज्याच्या मागे इंटरनेट वरील माहिती एका पेज वरून दुसऱ्या पानावर सहज वाचता यावी हा उद्देश्य होता.
खरं तर या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की या ऐतिहासिक शोधामागे टिम बर्नर्स-ली यांचे योगदान जरी अनन्यसाधारण असले तरी संस्थेतील कामावर असताना त्यांनी उपलब्ध संसाधनांचा वापर करून शोध लावला त्यामुळे या शोधाचे खरे हक्क हे CERN या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे राखीव होते आणि त्यातून त्यांनी जे पाऊल उचलले त्या मुळे या ऐतिहासिक घटनेत रंजकता आता खऱ्या अर्थाने अजून वाढते कारण टिम बर्नर्स-ली व CERN या संस्थेने जर ठरवले असते तर या शोधाचे पेटंट घेऊन ते इतके श्रीमंत झाले असते आणि आज ची परिस्थिती काय असू शकली असती यावरती तर कल्पना करताना आपण देखील थकून जाऊ.
पण मग त्यांनी असे काय केले की त्यांच्या निर्णयाने आज जगात जवळ जवळ सर्वांचे आयुष्य बदलून गेले. मुळात त्यांनी एका नव्या युगाचीच सुरुवात केली असे म्हणले तर वावगे ठरू नये. तर त्यांनी मिळून असा निर्णय घेतला की, www थोडक्यात (वेब) चे सोर्स कोड हे पब्लिक डोमेन म्हणून जाहीर केले म्हणजेच हे तंत्रज्ञान सर्वासाठी पूर्णपणे मोफत आणि रॉयल्टी फ्री करून दिले. आणि हा निर्णय झाला तो दिनांक म्हणजे 30 एप्रिल 1993 होता.
त्यांच्या या कृत्या मागे या तंत्रज्ञानाचा सर्वांना फायदा व्हावा तसेच याचा सगळीकडे प्रसार व्हावा आणि माहितीची देवाण घेवाण सर्वांना मुक्तपणे करता यावी हा होता. त्यांनी हे जाणले होते की एका व्यक्ती किंवा कंपनी च्या मालकीचे तंत्रज्ञान राहिल्यास हे तंत्रज्ञान नेहमी मर्यादितच राहील. आणि त्यांनी, त्यांना भेटू शकत असलेल्या त्यांच्या हक्काचा फायदा नाकारत पूर्ण जगाच्या चांगल्या भविष्या साठी एक महान त्याग केला. आणि त्यांचा विचार हा किती दूरदृष्टीचा व सार्थ होता हे आज आपणास बघायला मिळत आहे. त्यांनी जर हा निर्णय घेतला नसता तर नि:संशय ज्या वेगाने आपली प्रगती झाली त्या वेगाने ती झाली नसती.
यानंतर वेगवेगळे बदल होत आज इंटरनेट कोण एकाची खाजगी मालमत्ता नाहीये तर यावर सर्वांचा अधिकार आहे. पण मग इंटरनेट आणि वेब मधला फरक सोप्या भाषेत कसा समजायचा त्या साठी खालील चित्र पहा

पण तरीही लक्षात आले नसेल तर एका उदाहरणाने आपण हे अधिक सोपे करून लक्षात घेऊ शकतो ते म्हणजे जर आपण ईमेल किंवा व्हॉट्सऍप किंवा फेसबुक वापरत आहात तेव्हा इंटरनेट चा वापर करत आहात अगदी ऍमेझॉन चे अप्लिकेशन वापरले तरीही पण याच ठिकाणी ऍमेझॉन ऍप ऐवजी तुम्ही ब्राउज़र मध्ये ऍमेझॉन ची वेबसाइट ओपन केली तर तिथे तुम्ही वेब वापरत आहात. तर असो आपण इंटरनेट व वेब विषयी मूलभूत माहिती घेतली. याच विषयावर आणखी माहिती आमच्या पुढच्या लेखात वाचण्या करिता kridavishwa.in या वेबसाईट ला नेहमी भेट देत रहा. तसेच आपण ही वेबसाइट बुकमार्क देखील करू शकता.






