दिनांक : 27/05/2026
आजच्या या युगात इंटरनेट आणि मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे काहींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो, तर याच तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून यशाची शिखरे गाठणारेही कमी नाहीत. अशा वेळी तंत्रज्ञानाची भीती बाळगण्यापेक्षा, त्याचा वापर सकारात्मकतेसाठी कसा करावा, हे ठरवण्याची वेळ आज आपल्यासमोर आली आहे.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजात वाढतो आणि त्याचे एक घटक बनतो. आजच्या या वेगवान दुनियेत रोज नवनवीन आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात; पण दुर्दैवाने सगळंच चांगलं असतं असं नाही. संतांच्या, थोर समाज सुधारकांच्या या महाराष्ट्रात एका बाजूला अभिमानाने मान उंचावेल अशी कर्तबगिरी गाजवणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला समाजाला घातक ठरणारे घटकही आहेत. अशा नकारात्मक प्रवृत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि समाजात सुजाण नागरिक निर्माण करण्यासाठी केलेला हा एक छोटासा वैचारिक प्रयत्न आहे.
प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा आपण अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण जसे आजारपणावर उपचार व पुन्हा आजारपण येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय केल्याशिवाय निरोगी आयुष्याचा आंनद घेऊन जगता येत नाही, तसेच सामाजिक प्रतिकूलतेवर उपाय म्हणजे सुजाण समाजाची निर्मिती करणे हाच आहे.
आता मुख्य विषयावर येऊ; या ब्लॉगमध्ये आपणास काय मिळेल? आपण रोज अनेक बातम्या वाचतो, व्हिडिओ पाहतो आणि कळत-नकळत आसपासच्या घडामोडींवर लक्ष ठेवत असतो. वृत्तपत्रे किंवा न्यूज चॅनेल्स बातम्या सांगताना तटस्थ भूमिकेतून facts मांडत असतात, जे त्यांच्या कामासाठी आवश्यक आहे. परंतु, आज या तटस्थ बातम्यांमध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बातम्यांचा भरणा जास्त असतो. अशा वेळी नवीन पिढीला फक्त चांगल्याच वातावरणात ठेवून जगापासून अलिप्त ठेवण्यापेक्षा, अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर एका घरगुती आणि सुसंस्कृत वातावरणात चर्चा होणे आवश्यक आहे.
याच विचारातून या आगळ्यावेगळ्या ब्लॉगची सुरुवात होत आहे. इथे आपण रोज विविध घटना, कला आणि चालू घडामोडींच्या ‘समीक्षणा’च्या माध्यमातून जोडले जाऊ. आपला स्नेह आणि पाठिंबा असाच कायम राहावा हीच विनंती!
